लास वेगास येथील संगीत समारंभात अंदाधुंद गोळीबार करून ५९ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या स्टीफन पेडॉकने काही दिवसांपूर्वीच १ लाख डॉलर फिलीपाइन्सला पाठवले होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ६४ वर्षीय स्टीफनने आपल्या मैत्रिणीला ही रक्कम पाठवली होती. दरम्यान, स्टीफनने हे हत्याकांड का घडवले याचा पोलिसांना अद्यापही शोध लागलेला नाही. पोलीस त्याच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करत आहेत. स्टीफनला जुगार खेळण्याचाही नाद होता, असे पोलिसांनी सांगितले.

लास वेगासमध्ये ५९ जणांचा जीव घेणारा हल्लेखोर कोट्यधीश, जुगाराचा होता नाद

‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार निवृत्त लेखापाल असलेल्या स्टीफनने २२ हजार लोकांच्या समूहावर गोळीबार का केला होता, याची माहिती समजू शकलेली नाही. नवीन माहितीनुसार काही खळबळजनक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे. तपासात स्टीफनबाबत मागील ३ वर्षांतील २०० संशयास्पद माहिती समोर आली आहे. यात कॅसिनोमधील मोठ्या रकमेची देवाण-घेवाणीचा समावेश असल्याचे बोलले जाते. काही लोकांना हे संशयास्पद वाटते. तर काहींच्या मते एखादा ग्राहक १० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम कॅसिनोतून काढतो किंवा जमा करतो तेव्हा त्याची माहिती द्यावी लागते.

‘एनबीसी न्यूज’च्या वृत्तानुसार फिलीपाइन्स येथील खात्यात मागील आठवड्यात १ लाख डॉलरची रक्कम जमा करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६२ वर्षीय मारिलू डॅनली स्टीफनबरोबर राहत होती. परंतु, रविवारी ती फिलीपाइन्समध्ये होती. एवढी मोठी रक्कम त्याने आपल्या मैत्रिणीसाठी पाठवले होते की आणखी एखाद्या कारणासाठी हे अद्याप समजू शकलेले नाही.

लास वेगसचे मुख्य पोलीस अधिकारी जोसेफ लोबांर्डो म्हणाले की, या संपूण प्रकरणात डॅनलीकडून खूप महत्वाची माहिती समजू शकते. एफबीआय तिला अमेरिकेत आणणार आहे. तिच्याकडे स्टीफनने गोळीबार का केला, त्यामागे त्याचा काय उद्देश होता याची माहिती घेतली जाईल. तपास अधिकारी डॅनलीची चौकशी करत असून त्यांना याबाबत महत्वपूर्ण माहिती मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.