लास वेगाससाठी रविवारची रात्र ही काळरात्र ठरली. एका माथेफिरू व्यक्तीने संगीत समारंभात अदांधुंद गोळीबार केल्याने ५९ लोकांना आपला जीव गमवावा लागला तर ५०० हून अधिक जण जखमी झाले. या गोळीबारादरम्यान काही धाडसी प्रसंगही पाहायला मिळाले. सोन्नी मेल्टन या धाडसी व्यक्तीचा प्रसंगही समोर आला आहे. नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मेल्टनने आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी स्वत: गोळ्या झेलल्या. दुर्दैवाने या गोळीबारात मेल्टन ठार झाला. या घटनेनंतर मेल्टनच्या धाडसाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना दिसत आहे.

टेनेसी (पॅरिस) येथील हेन्री काऊंटी मेडिकल सेंटरने या गोळीबारात मेल्टनच्या मृत्यू झाल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेल्टन या मेडिकल सेंटरमध्ये काम करत होता. मंडेला बे शेजारील संगीत समारंभात जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा मेल्टन आपली पत्नी हिथरबरोबर तेथे उपस्थित होता. अंदाधुंद गोळीबार सुरू असताना मेल्टन आपल्या पत्नीची ढाल बनला. यामध्ये त्याला गोळ्या लागल्या. पत्नीचा जीव वाचला पण त्याचा मात्र मृत्यू झाला.

हिथर ही व्यवसायाने डॉक्टर आहे. मेल्टनने माझा जीव वाचवला पण स्वत: मात्र या जगापासून दूर गेला, असे हिथरने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले. तो अत्यंत नम्र आणि मदत करणारा व्यक्ती होता, अशा त्याच्या सहकाऱ्यांनी म्हटलं. दुसरीकडे पोलीस या अंदाधुंद गोळीबारामागचे कारण शोधण्यात व्यस्त आहे. त्यांना अजून कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही.

अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचे सांगण्यात येते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असली तरी तपास यंत्रणांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे अजूनतरी मान्य केलेले नाही. हल्लेखोर स्टीफन पेडॉकने हा गोळीबार केला होता. पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली होती. स्टीफन हा एक कोट्यधीश असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांची स्वत:ची दोन विमाने असल्याचेही सांगण्यात येते. हा हल्ला त्याने का केला हे गूढ अजून उलगडलेले नाही.