काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्य़ातील बिजबेहरा भागात ३६ तास चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या वेळी निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्येदरम्यान चुकून लागलेल्या गोळीने एका नागरिकाचाही बळी गेला.

घेरण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आणि तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे लष्कराच्या नॉर्दर्न कमांडने एका ट्विटमध्ये जाहीर केले. श्रीनगरमधील १५ कॉर्प्स मुख्यालयातील लष्करी अधिकाऱ्यांनी मात्र या मोहिमेबाबत भाष्य करण्यास नकार दिला.

हे दहशतवादी ज्या घरात लपले होते त्याच्या ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे दोन्ही दहशतवादी स्थानिक असून त्यातील माजिद मोहिउद्दीन झरगर हा शेजारच्या कुलगाम जिल्ह्य़ातील कोईमोह येथे, तर रुहुल अमिन दार हा अनंतनाग जिल्ह्य़ातील वेस्सू येथे राहणारा होता. त्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यापैकी एक मृतदेह अतिशय जळालेल्या अवस्थेत होता.

लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी या भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बुधवारी सायंकाळी या भागाला वेढा घातला होता. शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला.

चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या गटाला हाताळत असताना त्यांच्याकडून चुकून लागलेल्या गोळीने आरिफ शाह नावाचा नागरिक मारला गेला. दरम्यान, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी लष्करचे जिल्हा कमांडर होते आणि ते ठार झाल्यामुळे या संघटनेचा कणा मोडला गेला आहे, तसेच हे सुरक्षा दलांचे ‘मोठे यश’ आहे, असे विशेष पोलीस महासंचालक एस.पी. वैद म्हणाले.