दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थाची गळती झाली असून हवाई वाहतूक महासंचालनालय चौकशी करीत आहे. त्यासाठी एक पथक तातडीने स्थापन करण्यात आले. तथापि विमानतळावर किरणोत्सर्गी पदार्थ सापडलेला नाही व किरणोत्सर्जन झाले नाही असे अणुनियंत्रण मंडळ व दिल्ली सरकारने सांगितले. तुर्की येथून आलेल्या विमानाच्या मालवाहक भागात हा पदार्थ होता. हवाई सुरक्षा संचालकांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, किरणोत्सर्ग बंद करण्यात यश आले आहे त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सीमा शुल्क आयुक्त बी.के.बन्सल यांनी सांगितले की, मालवाहतूक विभाग तूर्त बंद करण्यात आला आहे.
 मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तुर्कस्थान एअरलाईन्सच्या इस्तंबूल येथून आलेल्या विमानातून (टीके ७१६) सोडियम आयोडाईड व सोडियम मॉलिब्डनेट सापडले. पहाटे ४.३२ वाजता हे विमान आले व त्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचे सकाळी ८.५९ वाजता लक्षात आले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भाभा अणुसंशोधन केंद्र व अणु खनिज विभाग यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. किरणोत्सर्गी पदार्थ निकामी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. तुर्कस्थानच्या सेलेबी या आस्थापनेच्या अधिपत्याखाली विमानातील सामान हलवण्याची व इतर कामे केली जातात. प्रभावित भागाला कडे करण्यात आले असून विमान वाहतुकीवर काही परिणाम झालेला नाही असे सांगण्यात आले.