गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात नव्याने उफाळून आलेला सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांच्या वक्तव्याने या वादात आणखी भर पडू शकते. लू कांग यांनी गुरूवारी भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी भारत एकाचेवळी पाकिस्तान, चीन आणि अंतर्गत अशा विविध आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे वक्तव्य केले होते. याच विधानावरून लू कांग यांनी लष्करप्रमुख रावत यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करताना म्हटले की, युद्धाची गर्जना करणाऱ्यांनी इतिहासापासून धडा घ्यावा. कांग यांच्या विधानाचा रोख भारत-चीन यांच्यात १९६२ साली झालेल्या युद्धाकडे होत्या. या युद्धात भारताला चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचेही लू कांग यांनी म्हटले. हे विधान प्रक्षोभक आहे. आम्हाला आशा आहे की, भारतीय लष्करातील व्यक्ती इतिहासापासून धडा घेतील आणि युद्धाच्या गर्जना थांबवतील, असे कांग यांनी सांगितले.

मानसरोवर यात्रा अडवणाऱ्या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला; विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

दरम्यान, कांग यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भारताने डोंगलांग परिसरातून सैन्य मागे घेतल्याशिवाय दोन्ही देशांमध्य चर्चा होणे शक्य नसल्याचेही सांगितले. सिक्कीम क्षेत्रातील डोंगलांग भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला भारताने आक्षेप घेतला होता. सिक्कीममध्ये सुरू केलेले रस्त्याचे काम वैध व कायदेशीर असून तो रस्ता चीनच्याच भागात बांधला जात आहे, तो भाग भूतान व भारत यांच्यापैकी कुणाचाही नाही असा दावा चीनने केला आहे. दुसऱ्या कुणाही देशाला आमच्या रस्ते बांधणीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही , असे चीनने म्हटले होते. भूतानचे चीनशी कुठलेही राजनैतिक संबंध नाहीत, त्यामुळे त्या देशाच्या वतीने भारत सिक्कीममधील रस्ते बांधणीस आक्षेप घेत आहे, असा आरोपदेखील चीनने केला होता. यावरून चीनने नाथुला खिंडीतून कैलास मानसरोवर यात्रेकरूंना प्रवेश देण्यासही मनाई केली होती. सिक्कीममध्ये भारत-चीन व भूतान यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथे भारताचे काही जुने बंकर होते. ते हटविण्यास चीनने भारतास सांगितले. मात्र भारताने त्यास नकार दिल्याने बुलडोझरचा वापर करून चिनी सैनिकांनी ते उध्वस्त केले होते.

भारतीय सैन्यानेच सिक्कीम भागात सीमा ओलांडल्याचा चीनचा कांगावा