महान बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांच्या मुलाला अमेरिकेच्या फ्लोरिडा विमानतळावर धर्मभेदी वागणुकीला सामोरे जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.फ्लोरिडाच्या फोर्ट लॉडरडेल हॉलीवुड विमानतळावर मोहम्मद अली ज्युनिअर आणि त्यांची आई खालिआ केमेको अली (मोहम्मद अली यांची पहिली पत्नी) यांच्यासोबत ७ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. हे दोघेजण जमैकाहून अमेरिकेत परतले होते. यावेळी त्यांची नावे अरबी शैलीची वाटल्याने इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना बाजूला नेले. यावेळी झालेल्या चौकशीदरम्यान अधिकारी त्यांना सातत्याने तुम्ही मुस्लिम आहात का, असा प्रश्न विचारत होते. या प्रश्नाला होकारार्थी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या धर्मासंदर्भात आणि तुम्ही कुठे जन्माला आलात?, असे आणखी काही प्रश्न विचारायला सुरूवात केली, अशी माहिती अली कुटुंबियांचे वकील क्रिस मॅकिनी यांनी दिली.

दरम्यान, कॅमिको अली यांनी मोहम्मद अली यांच्यासोबतचे छायाचित्र दाखविल्याने काहीवेळ चौकशी करून त्यांना सोडण्यात आले. मात्र, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मोहम्मद अली ज्युनिअर यांना तब्बल दोन तास अडवून ठेवले. यादरम्यान, त्यांच्यावर सातत्याने तुमचे हे नाव कुणी ठेवले? तुम्ही मुस्लिम आहात का?, अशा प्रश्नांचा सातत्याने त्यांच्यावर मारा करण्यात आला.  या सगळ्या प्रकारामुळे व्यथित झालेले मोहम्मद अली ज्युनिअर कायदेशीर तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. तुम्ही विमानतळावरुन चालत आहात आणि कोणीतरी येऊन तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल विचारते. हा भेदभावाचा उत्तम नमूना आहे. विशेष म्हणजे मोहम्मद अली ज्युनिअर यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारे अडविण्यात आले नव्हते. याशिवाय, अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची पद्धत ही त्यांना हवी ती उत्तरे देणारी असल्याचा आरोपही ज्युनिअर अली यांनी केला. दरम्यान, अली यांना अशाप्रकारची वागणूक मिळण्याचा संदर्भ अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम निर्वासितांविरोधात काढलेल्या फतव्याशी जोडला जात आहे.