इटालियान संशोधक व कलाकार लिओनार्दो दा विंची याने प्रथम चक्रीवादळे ओळखली असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. लिओनार्दो दा विंची हा कलाकार, वैज्ञानिक, संशोधक, संगीतकार होता.
अ‍ॅन पिझोरूसो या भूगर्भशास्त्रज्ञ व कला विद्वान महिलेने म्हटले आहे की, लिओनार्दो दा विंची यांच्या चित्रांमध्ये आपल्याला चक्राकार आवर्तने दिसतात. उपग्रहांचा शोध लागण्याच्या पाचशे वर्षे आधी त्याने चक्रीवादळाचे हे चित्र काढले होते.
पिझोरूसो हिने विंडसर कासल येथे राजदरबारी असलेल्या पुराच्या चित्रांचा अभ्यास केला व ती चित्रे विंचीने काढलेली आहे. ट्विटिंग दा विंची या पुस्तकात तिने हे निष्कर्ष मांडले आहेत. दा विंची याने १५१४ ते १५१८ या काळात १६ चित्रे काढली आहेत  त्यात बायबलमधील पुराच्या गोष्टींची प्रेरणा आहे. उपग्रह तंत्रज्ञानाचा शोध लागण्याच्या आधी दा विंची याने कलेतून चक्रीवादळ दाखवले आहे. लिओनार्दो हा चक्रीवादळ ओळखणारा पहिला व्यक्ती होता व हवामानवैज्ञानिकांना त्याचा शोध १९७० च्या आसपास लागला होता. एखाद्या काल्पनिक अक्षाभोवती हवेचा प्रवाह फिरतो तेव्हा त्याला व्होरटेक्स फ्लो पॅटर्न म्हणतात व पाणीही त्या पद्धतीने गोल फिरू शकते असे पिझोरूसोने द सन्डे टाइम्सला सांगितले. हे प्रवाह हे चक्रीवादळासारखेच असल्याचे चित्रातून दिसते. दा विंची याच्या आयुष्यात त्याच्या विंची या मूळ शहरावरून चक्रीवादळ गेले होते त्यावेळी अरनो नदीला पूर आला होता, त्यामुळे फ्लोरेन्समध्ये पुराचे पाणी शिरले होते. बेलिनझोना येथे आल्प्सजवळ दरडी कोसळल्या होत्या. ही वादळे कागदोपत्री नोंदलेली आहेत व वादळांमुळे झालेले हिमपात लिओनार्दोच्या नोंदीत सापडतात त्यात तो म्हणतो की, डोंगर दरीत सात मैल परिसरात हिमपात कोसळून संपला व तेथे तळे तयार झाले.
पिझोरूसो हिच्या मते दाट चक्राकार प्रवाह हे पुराच्या चित्रात जास्त दिसतात याचा अर्थ विंचीने वादळे पाहूनच चित्रे काढली होती. त्यातील काही घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने तर काही त्याविरुद्ध दिशेने फिरणारी वादळे आहेत. वातावरणात प्रवाह असेच फिरत असतात.