लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार झकीउर रेहमान लख्वीचा भाचा उत्तर काश्मीरमधील एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. बांदिपोरामध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी झकीउर रेहमान लख्वीचा भाचा अबू मुसैबला कंठस्नान घातले आहे. अबू मुसैब लष्कर ए तोयबाचा कमांडर होता. काश्मीरमधील बांदिपोरा भागात अबू मुसैब ऑगस्ट २०१५ पासून सक्रीय होता.

उत्तर काश्मीरमधील बांदिपोरा भागातील गांदेरबालमध्ये सक्रीय असणारा अबू मुसैब अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. गेल्या वर्षी स्वातंत्र्य दिनावेळी श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये अबू मुसैबचा हात होता. ‘हाजीनपासून ३२ किलोमीटर अंतरावर एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलासह राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. यानंतर परिसरात शोध मोहिम हाती घेण्यात आली,’ अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली.

‘परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्याने सर्च ऑपरेशन करणाऱ्या जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर एन्काऊंटरला सुरुवात झाली. अखेर दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यावर हे एन्काऊंटर संपले. या एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मुसैब असून तो पाकिस्तानचा रहिवासी आहे,’ अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे.

‘मुसैब हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी झकीउर रेहमान लख्वी याचा भाचा होता. मुसैब हा स्वतंत्रपणे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करत होता. मुसैब लष्कर ए तोयबाचा कमांडर होता,’ अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे. मुसैबकडे एके-५६ रायफल, तीन मॅगझिन्स, ६६ राऊंड, रेडिओ सेट आणि तीन ग्रेनेड सापडली आहेत.

‘अबू मुसैब बांदिपोरा भागात ऑगस्ट २०१५ पासून सक्रीय होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. ऑक्टोबर २०१५ मध्ये १४ राष्ट्रीय रायफल्स जवानांची शस्त्रे बांदिपोरामधून पळवण्यात आली होती. या कारवाईतही अबू मुसैबचा समावेश होता. हाजीनमध्ये अबू मुसैबने केलेल्या गोळीबारात एक नागरिक जखमी झाला होता. याशिवाय गेल्या वर्षी १३ राष्ट्रीय रायफल्सच्या ताफ्यावर अबू मुसैबने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते,’ अशी माहिती पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.