जम्मू काश्मीरमधील पुलवामातील काकपोरा परिसरातील बांदेरपोरा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर ए तोएबाचा कुख्यात दहशतवादी अयूब लाहिरीचा खात्मा केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाहिरी ‘लष्कर’चा विभागीय कमांडर होता. सुरक्षा दलांना एका घरात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. भारतीय सुरक्षा दलाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

सध्या सुरक्षा दलांकडून उर्वरित दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. दोन्हीबाजूने गोळीबार सुरू आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गावात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर ४७ राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली सेना आणि राज्य पोलिसांच्या विशष पथकाने शोध मोहीम सुरू केली होती.

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलल्या गोळीबारात ‘लष्कर’चा टॉप कमांडर अयूब लाहिरी मारला गेला. अजूनही गोळीबार सुरू आहे.