जम्मू काश्मीरमधील उरी व हंदवारा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश-ए-मोहमद नव्हे तर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती राष्ट्रीय गुप्तचर संस्थेमधील (एनआयए) सूत्रांनी दिली आहे. या हल्ल्यामागे इतक्या दिवस जैश ए मोहमद या संघटनेचा हात असल्याचे बोलले जात होते. परंतु आता एनआयएने ही शक्यता फेटाळली आहे.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात उरी येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मोठ्याप्रमाणात भारतीय जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी २९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचे सुमारे ७ ते ८ तळ नष्ट केले होते. या कारवाईत ३० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
उरी व हंदवारा येथील हल्ल्याचा तपास एनआयएने सुरू केला होता. उरीमध्ये हल्ला करणाऱ्या ४ दहशतवाद्यांकडे २ जीपीएस यंत्रे होती. उपग्रहाच्या माध्यमातून कार्यान्वित होणाऱ्या याच यंत्राचा वापर दहशतवाद्यांनी केला होता. याच यंत्रांमुळे या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट झाला होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात पाकिस्तानमधून केल्याचे उघड झाले आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उरी हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, या हल्ल्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने दहशतवाद्यांच्या त्यांच्या कमांडरसोबत बोलण्याच्या सांकेतिक पद्धतीवर या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली होती.