बुडालेल्या जहाजातून बचावलेला एक तरुण आणि वाघ यांच्या समुद्रसफरीची रोमांचक कहाणी असलेल्या ‘लाइफ ऑफ पाय’ या भारतीय कथा आणि कलाकार असलेल्या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत तब्बल ११ नामांकने मिळवली आहेत. अँग ली या ऑस्करविजेत्या दिग्दर्शकाने साकारलेल्या या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण यांसह सवरेत्कृष्ट गीतासाठीही नामांकीत करण्यात आले आहे.
मुंबईतील झोपडपट्टीतील दोन मुलांची कथा असलेल्या ‘स्लमडॉग मिलियनेअर’ने तीन वर्षांपूर्वीच्या ऑस्कर सोहळय़ात बाजी मारल्यानंतर ‘लाइफ ऑफ पाय’च्या रुपाने पुन्हा एकदा भारतीय कथा ऑस्करच्या शर्यतीत उतरली आहे. आपल्या कुटुंबासह आणि वडिलांच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांसह पाँडेचरीहून कॅनडाला निघालेल्या पाय या मुलाचे जहाज समुद्रात बुडते. त्यातून बचावलेला पाय व एक वाघ यांचा लाइफबोटीतील २२७ दिवसांचा थरारक प्रवास या थ्रीडी चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अँग ली या विदेशी दिग्दर्शकाने केले असले तरी त्यातील कथा भारतीय संस्कृतीवर आधारीत आहे. तसेच यात इरफान खान, तब्बू आणि आदिल हुसेन या भारतीय कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, संकलन, छायाचित्रण या प्रमुख वर्गात नामांकन मिळाले आहे. याशिवाय कर्नाटकी शैलीतील शास्त्रोक्त गायिका बॉम्बे जयश्री यांना या चित्रपटातील गाण्यासाठीही ऑस्कर नामांकन मिळाले आहे.
भारताचे ‘ऑस्कर कनेक्शन’ एवढय़ावरच संपले नसून यंदाच्या पुरस्कारांत सर्वाधिक १२ नामांकने मिळवणारा स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘लिंकन’ हा चित्रपट भारतीय उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ड्रीमवर्क्‍सची निर्मिती आहे. तर सवरेत्कृष्ट चित्रपट पुरस्कारातील अन्य एक चित्रपट ‘द सिल्व्हर लायनिंगस प्लेबुक’ या चित्रपटात अनुपम खेर हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा येत्या २४ फेब्रुवा्ररी रोजी लॉस एंजिलिस येथे पार पडणार आहे.