नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (२५ जुलै) दुपारी सव्वा बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद राष्ट्रपतिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र सेंट्रल हॉलमध्ये बसण्यासाठी अतिशय कमी जागा असल्याने सरकारसमोर अडचण निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोविंद यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला ‘मोठा इव्हेंट’ करण्याची इच्छा आहे. मात्र जागेच्या कमतरतेमुळे सरकारसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनादेखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे निमंत्रितांनी या सोहळ्याला येताना पती किंवा पत्नीला आणू नये, अशी सूचना निमंत्रण पत्रिकेत देण्यात आली आहे. आधीच्या सरकारांपासून चालत आलेल्या प्रथांचे पालन करत असल्याचेदेखील निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. यासोबतच सेंट्रल हॉलमध्ये जागेचीदेखील कमतरता आहे.

इंडिया संवाद डॉट कॉम या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, कोविंद यांच्या शपथविधीला किती जणांना निमंत्रित करायचे, याबद्दलचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला. इतक्या कमी वेळात निमंत्रितांनी यादी तयार करण्यात आल्याने सर्वांना निमंत्रण पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे दिल्लीतील सर्व राज्यांच्या निवासी आयुक्तांना निमंत्रणपत्रिका देण्यात आल्या.

राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा एका प्रोटोकॉलनुसार संपन्न होतो. यानुसार भावी राष्ट्रपती सकाळीच सकाळी राष्ट्रपती भवनात पोहोचतात. यावेळी राष्ट्रपतींचे सचिव त्यांना एस्कॉर्ट करतात. भावी राष्ट्रपती आणि सध्याचे राष्ट्रपती काफिल्यासोबत संसद भवनात पोहोचतात. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती भावी राष्ट्रपती आणि सध्याचे राष्ट्रपती या दोघांना सेंट्रल हॉलमध्ये नेतात. यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात होते.