एमआयटीमधील भारतीय वैज्ञानिकांचे संशोधन

केचअप, डिंकाची बाटली, श्यॅंम्पू यांच्या बाटल्यातून शेवटचा थेंब कधीच निघत नाही त्यामुळे केचअप, डिंक व श्यॅंम्पू काही प्रमाणात बाटल्यांमध्ये राहतेच. त्याच्या शेवटच्या थेंबाचाही वापर करता यावा यासाठी एमआयटीत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने उपाय शोधला आहे. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील कृपा वाराणसी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी लिक्विग्लाइड नावाचे आवरण तयार केले असून ते बाटलीच्या आतून लावल्यास शेवटच्या थेंबापर्यंत हे पदार्थ वापरता येतात.

प्रयोगशाळेतील संशोधन बाजारपेठ व ग्राहकांना थेट उपयोगी पडण्याचे हे उदाहरण आहे. लिक्विग्लाइड या आवरणामुळे बाटली आतून आणखी घर्षणहीन होते व त्यामुळे केचअप, डिंक किंवा श्यॅंम्पूचा शेवटचा थेंबही निघून येतो. पेंट किंवा इतर सौंदर्यप्रसाधनांसाठीही त्याचा वापर करता येईल. अर्धप्रवाही द्रव हे बाटलीला आतून चिकटून राहतात त्यामुळे त्यांचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे उद्योगांचे व ग्राहकांचेही मोठे नुकसान होत असते, असे वाराणसी यांचे म्हणणे आहे. पेंट उत्पादनात पेंट आत चिकटून बसल्याने वर्षांला १० कोटी गॅलन पेंट वाया जातो व अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होते. लिक्विग्लाइड आवरणाचा वापर करून हे नुकसान वाचवता येणार आहे.

आरोग्य व ऊर्जा क्षेत्रातील उत्पादनात हे नवीन तंत्रज्ञान वापरता येणार आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे केचअप, मध, स्किन क्रीम यांच्या बरण्या स्वच्छ होईपर्यंत हे पदार्थ वापरता येतील. जल शुद्धीकरण, निक्षारीकरण व कृषी सामुग्री यातही या तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. लिक्विग्लाइड बरोबर वाराणसी यांनी एमआयटीचे प्रोफेसर कॅरेन ग्लीसन यांनी ड्रॉपवाईज ही स्टार्ट अप कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी शाश्वत जलरोधक आवरणे ऊर्जा प्रकल्प व यंत्रांसाठी तयार करते. जगात ८५ टक्के वीज ही वाफेवर तयार होते. ती वाफ जीवाश्म इंधनांच्या मदतीने तयार केली जाते. त्यामुळे यातील यंत्रणांची कार्यक्षमता सुधारणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊ शकते.