तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात निधन झाले. जयललिता यांची प्रकृती सुधारत आहे, असे वाटत असतानाच त्यांना रविवारी संध्याकाळी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. अखेर काल रात्री ११.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निधन झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास जयललिता यांचे पार्थिव पोएस गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर सामान्य जनतेच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या जयललिता यांच्या समर्थकांनी राजाजी हॉलमध्ये मोठी गर्दी केली असून याठिकाणी एआयएडीएमके पक्षाचे नेतेही उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूदेखील याठिकाणी हजर आहेत. आज दिवसभर त्यांचे पार्थिव सामान्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी साधारण चारच्या सुमारास मरिना बीच येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर राज्यात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून या काळात राज्यातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतर समर्थकांचा शोक अनावर झाला आहे. काल रात्री त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर समर्थकांनी जयललिता यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूतील राजभवनात  शपथविधी पार पडला. जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यापार्श्वभूमीवर एआयएडीएमकेच्या आमदारांची  महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडे एआयएडीएमकेचे अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. राजभवनात अत्यंत साधेपणाने शपथविधी पार पडला. प्रत्येक आमदाराच्या चेह-यावर जयललिता यांच्या निधनाचे दुःख दिसत होते. ओ. पन्नीरसेल्वम यांनी शपथ घेण्यापूर्वी जयललिता यांचे छायाचित्र स्वतःच्या खिशात ठेवले. तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

Live Updates
13:44 (IST) 6 Dec 2016
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाना राजाजी हॉलमध्ये पोहचले
12:02 (IST) 6 Dec 2016
राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना चेन्नईला आणणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; राष्ट्रपती दिल्लीला परतले
11:49 (IST) 6 Dec 2016
जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चेन्नईला जाणार
08:00 (IST) 6 Dec 2016
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी चेन्नईला जाणार
07:39 (IST) 6 Dec 2016
जयललिता यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ४ वाजता मरिना बीचवर होणार अंत्यसंस्कार