अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर आगमन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजनैतिक शिष्टाचार बाजूला सारत ओबामांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विमानतळावर ओबामांची गळाभेट घेतली. त्यानंतर ओबामा त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलेल्या आयटीसी मौर्या शेरटन हॉटेलकडे रवाना झाले.
तत्पूर्वी, ओबामा यांचा नियोजित आग्रा दौरा रद्द झाल्यामुळे ते मंगळवारी नवी दिल्लीतून थेट सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांच्या अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत. मात्र, यापूर्वी रविवारी सकाळी भारतात दाखल झाल्यापासून ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात एकत्र असतील. यामध्ये स्वागत समारंभ , द्विपक्षीय चर्चा, खाजगी भोजन, उद्योजकांच्या गाठीभेटी, ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग, मेजवानी समारंभ, प्रजासत्ताक दिनाचे संचलन आणि राष्ट्रपतींच्या निवासस्थानी बैठक अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. यादरम्यान, भारताच्या महत्त्वपूर्ण असलेल्या दृष्टीने नागरी अणुउर्जा कायद्याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. अणुउर्जेच्या अमेरिकन पुरवठादारांना यावेळी नरेंद्र मोदींकडून आश्वस्त केली जाण्याची शक्यता आहे. या दोन नेत्यांमधील ही अभूतपुर्व अशी भेट असेल. यावेळी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक प्रश्नांविषयी चर्चा होणार असल्याचे अमेरिकन प्रशासनाकडून सांगण्यात आले. याशिवाय, दहशतवादाविषयीच्या माहितीचे आदानप्रदान करण्याच्या मुद्द्यावरदेखील यावेळी चर्चा होऊ शकते. दोन्ही देशांचे संरक्षण सल्लागार या बैठकीला उपस्थित असणार आहेत.

ओबामा आणि नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकारपरिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
* अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम या शहरांच्या विकासासाठी अमेरिका मदत करणार, तिन्ही शहरे स्मार्ट सिटी बनवू – ओबामा
* अणुकरारातील अतिशय महत्वाच्या अशा दोन मुद्द्यांवर सहमती- बराक ओबामा
* सामरिक, संरक्षणविषयक आणि व्यापाराच्या विषयांवर आमच्यात चर्चा झाली : बराक ओबामा
* ओबामांच्या भाषणात हिंदी शब्दांचा पुरेपूर वापर… ‘चाय पे चर्चा’ केल्याबद्धल पंतप्रधान मोदींचे मानले आभार!
* ‘नमस्ते’ ‘मेरा प्यारभरा नमस्कार’ या संबोधनांनी अध्यक्ष बराक ओबामांच्या निवेदनाची सुरूवात
* अमेरिकेने अपारंपरिक उर्जा जगभरात सर्वांना परवडेल तसंच सर्वांना सहज साध्य होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मी बराक ओबामांना करतो : नरेंद्र मोदी
* भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत, हे नाते आणखी पुढे नेण्याची आणि अधिक बळकट करण्याची गरज : नरेंद्र मोदी
* नागरी अणुकरारामुळे दोन्ही देशातील लोकांमध्ये विश्वास वाढवेल : मोदी
* बराक ओबामा यांनी अतिशय व्यस्त कार्यक्रमातून भारतात येण्यासाठी वेळ काढल्याबद्धल पंतप्रधानांनी ओबामांचे आभार मानले. बराक ओबामा आणि मिशेल ओबामा याचं स्वागत करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट : नरेंद्र मोदी
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष बराक ओबामा यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू

बराक ओबामा यांच्या दौऱ्याचे लाईव्ह अपडेटस पुढीलप्रमाणे:

* थोड्याचवेळात ओबामा आणि नरेंद्र मोदींची संयुक्त पत्रकारपरिषद
* नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर अध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनौपचारिक चर्चा
* अमेरिकेकडून भारतात आलेल्या पहिल्या टेलिग्रामची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बराक ओबामांना भेट
* हैदराबाद हाऊसमध्ये भारत-अमेरिका शिष्टमंडळाच्या चर्चेला सुरूवात
* बराक ओबामा हैदराबाद हाऊसमध्ये पोहोचले
* बराक ओबामा राजघाटावर पोहोचले… राजघाटावर शांततेचं प्रतिक म्हणून बोधिवृक्षाचं रोपण करणार…
* अध्यक्ष बराक ओबामा थोड्याच वेळात महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचणार…
*अध्यक्ष बराक ओबामा यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला…
*अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना २१ तोफांची सलामी, गार्ड ऑफ ऑनरला सुरूवात
*बराक ओबामा राष्ट्रपती भवनात दाखल
* बराक ओबामा राष्ट्रपती भवनाकडे रवाना
* राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या उपस्थितीत दिली जाणार मानवंदना
* ओबामा थोड्याचवेळात राष्ट्रपती भवनात पोहचणार
* भारतीय लष्कराकडून ओबामांना दिली जाणार मानवंदना
* ओबामा आयटीसी मौर्या शेरटन हॉटेलकडे रवाना
* पंतप्रधानांनी विमानतळावर ओबामांची गळाभेट घेतली.
* दिल्लीच्या पालम विमानतळावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे आगमन

 

1422157866441219