पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये बहारिच येथे झालेल्या परिवर्तन रॅलीत राज्यातील समाजवादी सरकारवर मोबाइलवरून केलेल्या भाषणात निशाणा साधला. उत्तर प्रदेशमधील गरिबी आणि गुंडाराज संपुष्टात आणण्याची गरज असून राज्याला प्रगतीच्या नव्या दिशेने नेण्यासाठी येथील लोकांनी भाजपला सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान मोदी हे स्वत: रॅलीत सहभागी होऊन नागरिकांना मार्गदर्शन करणार होते. परंतु खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तेथे उतरू शकले नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइलवरून जनतेशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी या वेळी नोटाबंदीच्या निर्णयावरही भाष्य केले. काळा पैसा लपवणाऱ्यांच्या मागे हे सरकार हात धुवून मागे लागलेले असून गरीबांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

तत्पूर्वी उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्या यांनी खराब हवामानामुळे पंतप्रधान मोदी हे परिवर्तन रॅलीत सहभागी होणार नसून ते मोबाइल फोनवरून जनतेला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. यापूर्वी ते गाजीपूर येथ १४ नोव्हेंबर रोजी, आग्रा येथे २० नोव्हेंबर, कुशीनगर येथे २७ नोव्हेंबर, मुरादाबाद येथे ३ डिसेंबर रोजी त्यांनी परिवर्तन रॅलीत सहभागी होऊन जनतेला मार्गदर्शन केले आहे. बहारिचनंतर ते आता १९ डिसेंबर रोजी कानपूर येथील रॅलीत सहभागी होतील.