केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांच्या काळात देशातील शेतकरी, गरीब आणि सामान्य जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त उत्तरप्रदेशच्या सहारनपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांच्या काळात शेतकरी, गरीब आणि सामान्य वर्गासाठी राबविलेल्या योजनांचा पाढा वाचला. भाजप सरकार सत्तेत आले तेव्हाच मी हे सरकार देशातील गरीबांसाठी समर्पित असल्याचे मी सांगितले होते. त्यानुसार सरकारने गेल्या दोन वर्षात गरीबी दूर करण्याची आणि गरीबांना ताकद देणारी अनेक कामे केल्याचा दावा केला. याशिवाय, सरकारने राज्यांना बळकट करण्यासाठी पूर्वापार सुरू असलेली पद्धत मोडून सर्व राज्यांना अधिकाअधिक निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीपर्यंत जास्तीत जास्त निधी पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. जेणेकरून सामान्य लोकांचे जीवनमान उंचावेल. तसेच गेल्या दोन वर्षात मोदी सरकारमधील कुणी एक रूपयाही खाल्ल्याच्या बातम्या कोणत्या वर्तमान पत्रात वाचल्या का, असा सवाल करत मोदींनी आमचा पक्ष निष्कलंक असल्याचाही दावा केला. यावेळी नरेंद्र मोदींच्या भाषणाचा रोख मुख्यत्वेकरून शेतकरी, गरीब,  सामान्य जनता, भ्रष्टाचार, ‘बेटी बचाव बेटी पढाव योजना’ या मुद्द्यांभोवती केंद्रित होता.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:
* ऊसाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून मिळणारी वाईट वागणुकीवर चाप लावणार.
* पिडीत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील नियम बदलला. शेतीचे एक तृतीयांश नुकसान झाल्यावरही नुकसान भरपाई मिळणार.
* आगामी काळात देशातील तीन कोटी कुटुंबाना गॅस जोडणी देणार
* खासगी डॉक्टरांना गरिब गरोदर मातांचे दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत उपचार करण्याचे आवाहन
* केंद्र सरकार सरकारी डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ करणार
* शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणली
* हा देश बदलतोय, मात्र काही लोकांचा मेंदू बदलत नाही, मोदींची विरोधकांवर टीका