थोड्या दिवसांनी रामलीलेतील रामालाही मोदींचा मुखवटा घातला जाईल, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची खिल्ली उडवली. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशींवरील महात्मा गांधींजी यांचे छायाचित्र हटवून त्याजागी नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापण्यात आल्याने गेल्या काही दिवसांपासून देशभरात राजकीय वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी उत्तराखंडच्या ह्रषिकेश येथील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. ज्याने तिरंग्यासाठी छातीवर तीन गोळ्या झेलल्या त्यांचे छायाचित्र मोदींनी हटवले. चरखा हे गरिबांच्या श्रमाचे प्रतिक आहे. एकीकडे मोदी चरख्यासोबत छायाचित्र काढून घेतात आणि दुसरीकडे दिवसभरात ५० उद्योगपतींची कामे मार्गी लावतात. थोड्या दिवसांनी रामलीलेतील रामही मोदींचा मुखवटा घालून येईल. मोदींनी आता थोडी तपस्या करावी, पद्मासन घालावे. संपूर्ण जगाला दाखवून द्यावे की, मोदींनी तपस्या केली आहे आणि ते योगाचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत,अशी उपहासात्मक टीका राहुल गांधी यांनी केली.

यावेळी राहुल गांधी यांनी नोटाबंदी, गरिबी, रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपला लक्ष्य केले. ज्याप्रमाणे मोदींनी नोटाबंदीचा निर्णय काही क्षणांत घेतला तसेच त्यांनी ‘एक श्रेणी एक वेतन’  च्या (ओआरओपी) बाबतीतही करावे, असे राहुल यांनी म्हटले. मोदींनी संपूर्ण देशाला घाबरवून सोडले आहे. ज्यांच्याकडे पेटीएम नाही त्यांना बाहेर काढले जाते.  यावेळी राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित करताना सरकारच्या दबावाखाली न राहता आर्थिक निर्णय  घेण्यासाठी काँग्रेसच्या काळात रिझर्व्ह बँकेची स्थापना आणि सक्षमीकरण करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, मोदींनी अवघ्या काही क्षणांत या संस्थेचा आत्माच मारून टाकला, अशी टीका राहुल यांनी केली.  गरिबीचे राजकारण करणाऱ्या मोदींनी गरिबी कधी अनुभवलेली नाही. माझा कुर्ता किंवा खिसा फाटला तरी मला काही फरक पडत नाही. मात्र, मोदींचे कपडे कधीच फाटले नसतील आणि ते गरिबांचे राजकारण करू पाहत आहेत, असे राहुल यांनी म्हटले.