दिल्ली महानगर पालिकेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये आज ५४ टक्के मतदान झाले. आदमी पार्टी, काँग्रेस भाजप या पक्षांमध्येच मुख्य लढत आहे. एकूण २७२ जागांसाठी १४ हजार मतदान केंद्रावर आज मतदान झाले. सध्या भाजपकडे १३८, काँग्रेसकडे ७८ जागा आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे १ कोटी ३२ लाख मतदार असून २३१५ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. येत्या बुधवारी (दि.२६) मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.

दिल्लीतील तुघलकाबाद, जामिया नगर, संगम विहार, सीमापुरी, सीलमपूर, नजफगढ, मुंडका, सल्तानपुरी आणि नांगलोईसारख्या भागात १४६८ मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत राबवण्यासाठी १ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

यंदाची निवडणूक सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचे आव्हान आहे तर काँग्रेसमध्ये दिल्लीत पुनरागमन करण्याचा दबाव आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला ही निवडणूक अग्निपरीक्षेसारखी आहे. या निवडणुकीच्या निकालावरून आम आदमी पक्ष हा दिल्लीच्या अपेक्षांना पूर्णपणे उतरले आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.