रेल्वे प्रवाशांना मिळणारे जेवण खाण्यालायक नसल्याचे ताशेरे कॅगने अहवालातून ओढल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. हा गदारोळ कमी होतो न होतो तोच आता पुन्हा एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशानं मागवलेल्या व्हेज बिर्याणीमध्ये पाल सापडल्याची घटना समोर आली आहे. बिर्याणीत पाल सापडल्यानंतर संबंधित प्रवाशानं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टॅग करून बिर्याणीत पाल सापडल्याचा फोटो ट्विट केला. प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे अधिकारी खडबडून जागे झाले असून, त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिल्लीहून कोलकाताकडे जाणाऱ्या पूर्वा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशानं मागवलेल्या व्हेज बिर्याणीत पाल सापडली आहे. प्रवाशानं याबाबत रेल्वेकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वेनं तात्काळ कारवाई करत एक्स्प्रेसमधील कॅटरिंगचं कंत्राट रद्द केलं आहे. मी व्हेज बिर्याणी मागवली होती. त्यात पाल सापडली. याबाबत मी रेल्वे अधिकारी आणि कॅन्टीनच्या व्यवस्थापकांना तक्रार केली. त्यानंतर रेल्वेमंत्री प्रभू यांना टॅग करून त्याचा फोटो ट्विट केला, अशी माहिती प्रवाशानं दिली. ट्विटनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आणि कानपूर विभागाच्या व्यवस्थापकांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. चौकशीनंतर दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेचे अधिकारी किशोर कुमार यांनी दिले.

दरम्यान, रेल्वेचं जेवण खाण्यालायक नाही, असा अहवाल नियंत्रक व महालेखापालांनी दिला होता. रेल्वे कॅन्टीनमध्ये मिळणारं जेवण आणि पदार्थांच्या दर्जाबाबत प्रवासी तक्रार करतात. कॅगनंही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. डब्बाबंद पदार्थांची मुदत संपलेली असली तरी जेवणात त्याचा वापर केला जातो, असंही कॅगनं अहवालात म्हटलं होतं. रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जेवण तयार करताना स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं कॅगच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आलं होतं. रेल्वे किचनमध्ये अशुद्ध पाण्याचा वापर होत असल्याचंही आढळून आलं.