केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘स्वच्छ भारत अभियान’ सध्या स्वच्छतेच्या कामांऐवजी भलत्याच कारणांसाठी चर्चेत येत आहे. अशीच एक घटना मध्यप्रदेशात घडली असून शहरात भाजप कार्यकर्त्यांचे स्वच्छता अभियान सुरु असताना एका महिला नेत्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला झोडपून काढत अर्वाच्य शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.


मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील शहर सिवनी येथे हा प्रकार घडला असून येथील बस स्थानकात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सुरु होता. यासाठी सर्व तयारी करण्यात आली होती. बस स्थानक असल्याने परिसरात लोकांची चांगलीच वर्दळ होती. मात्र, याच ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेण्याचे ठरवल्याने त्यासाठी अभियानाचा फलकही येथे लावण्यात आला होता. त्यापुढे भाजप कार्यकर्त्यांचा स्वच्छता कार्यक्रम सुरु होता. मात्र, सार्वजनिक ठिकाण आणि वर्दळीचे असल्याने त्यांच्या कार्यक्रमस्थळावरून एक पुरुष व्यक्ती पुढे जात असताना भाजपच्या महिला नेत्याचा अचानक पारा चढला. या महिला नेत्याने चक्क त्या पुरुषाला झोडपायला सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी काही पोलिसही उपस्थित होते. यापैकी एका पोलिसाने संबंधित व्यक्तीला संरक्षण देत महिला नेत्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाईंचा पारा इतका चढला होता की, तिने त्या पुरुषाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली. या प्रकारामुळे स्वच्छता अभियान बाजूला राहिले आणि उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. मात्र, सर्वसामान्यांना वेठीस धरुन मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे राजकीय नेते म्हणवून घेणाऱ्या अशा लोकांवर टीकाही होत आहे.

यापूर्वीही देशभरात स्वच्छता अभियानातंर्गत राबवण्यात आलेले उपक्रम वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आले होते. काही भाजप नेत्यांनी स्वच्छ जागांवर कचरा टाकून ती जागा पुन्हा स्वच्छ केल्याचा ढोंगीपणाही केला होता. या सगळ्याची छायाचित्रे आणि व्हिडिओही समोर आले होते. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा हेतू बाजूलाच राहिला असून केवळ इव्हेंट आणि फोटो काढून मिरवण्यापुरतेच हे अभियान राबवले जात असल्याचे चित्र निर्माण होत आहे.