केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून देशात असहिष्णुतेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या विरोधकांच्या दाव्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेत खंडन केले. हा आरोप निराधार असल्याचे ते म्हणाले. तसेच देशातील सलोख्याचे वातावरण बिघडवू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

देशात राहण्यायोग्य वातावरण नसल्याचे चित्र निर्माण करणे म्हणजे देशाची प्रतिमा मलीन करून परकीय गुंतवणुकीला खीळ घालण्यासारखेच आहे, असेत्यांनी सांगितले. दादरी घटना आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले. असहिष्णुतसंबंधी संसदेतील चर्चेला उत्तर देताना त्यांनी लेखक, कलाकार आणि वैज्ञानिकांना त्यांनी परत केलेले पुरस्कार पुन्हा स्वीकारण्याची विनंती केली.