राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार ठरावावेळी संसदीय कामकाजमंत्री वैंकय्या नायडू यांनी केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह असल्याची टीका करीत कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सर्वच विरोधी पक्षांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासावेळी घोषणाबाजी करीत लोकसभेत गोंधळ घातला. नायडू यांनी केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह असून, त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज साडेअकरा वाजेपर्यंत तहकूब केले.
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर नायडू यांनी स्वतःहून निवेदन करीत कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. आपण केवळ सत्य परिस्थितीचे कथन केले, असे सांगितले. मात्र, विरोधकांचे या निवेदनावरून समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी निवेदनानंतरच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. खर्गे यांनी विरोधकांची भूमिका मांडताना सांगितले की, नायडू यांना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, दुसऱयाच्या स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांना आपली बाजू मांडता येणार नाही. नायडू यांनी सीपीआयचा उल्लेख कंझ्युमर प्राईस इंडेक्स असा करणे अयोग्य होते. त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेसबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी त्याबद्दल माफी मागितलीच पाहिजे.
खर्गे यांच्या मागणीनंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केल्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि सर्व विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमले. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.