हैदराबादमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी बारावाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. बारा वाजता कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दुपारी अडीच वाजता संसदेमध्ये निवदेन करणार आहेत. 
लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झाल्यावर सुरुवातीला हैदराबाद स्फोटातील मृतांना सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास रद्द करून हैदराबाद स्फोटांबाबत चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. आंध्र प्रदेशमधील काही खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांच्यासमोर जाऊन घोषणा देण्यास सुरुवात केली. विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसल्यावर मीराकुमार यांनी कामकाज बारावाजेपर्यंत स्थगित केले.
राज्यसभेमध्येही विरोधकांनी याच विषयावर चर्चा करण्याची मागणी केली. सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यावर राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनीही दुपारी बारावाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.
शिंदे हे शुक्रवारी सकाळी हैदराबादमध्ये गेले असल्याने ते संसदेत उपस्थित नव्हते.