सहा छाप्यांमध्ये सात इस्लामी दहशतवाद्यांना अटक केली असल्याचे लंडन पोलिसांनी सांगितले आहे. ब्रिटनच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अझिकारी मार्क रॉली यांनी याबाबत माहिती दिली. लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. आम्ही सहा पत्त्यांवर छापे मारले आणि त्या ठिकाणाहून सात जणांना अटक केली आहे. लंडन आणि बर्मिंगहम शहरात पोलिसांनी छापे मारले.  बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने लंडन शहर हादरले. लंडनमधील ब्रिटिश संसदेबाहेर गोळीबार, कारने लोकांना चिरडणे आणि चाकू हल्ल्यासारख्या घटना घडल्या.

वेस्टमिनिस्टर पुलाजवळ झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाल्याचे रॉयटर्सने सांगितले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला दोन पद्धतीने करण्यात आला. संसदेच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ एका भरधाव कारने लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकू हल्लाही करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात फ्रेंच विद्यार्थी जखमी झाल्याचे फ्रेंच पंतप्रधानांनी सांगितले आहे.

हल्ल्यावेळी संसदेत २०० हून अधिक खासदार उपस्थित होते. हे सर्व खासदार सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला होता. लंडनमधील भूमिगत रेल्वे व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती.  ही घटना झाल्यापासून पोलिसांनी संशियतांचा कसून शोध घेतला. त्यामध्ये पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. एका पोलिसाला देखील चाकूने भोसकण्यात आले होते.  पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या हल्ल्यात गेटजवळ एक दहशतवादी ठाक झाला होता. पंतप्रधान थेरेसा मे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्लेखोर हे विकृत होते अशा शब्दांत त्यांनी या हल्ल्याची निंदा केली.