लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण केंद्राच्या अस्तित्वाबाबत एका दंडाधिकाऱ्याने बुधवारी पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयात आपली जबानी नोंदविली. मात्र अन्य तीन साक्षीदार न्यायालयात फिरकलेच नाहीत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची सुनावणी दहशतवादविरोधी न्यायालयात सुरू आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीला चार अधिकृत साक्षीदार २५ फेब्रुवारी रोजी उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने या साक्षीदारांवर न्यायालयात बुधवारी हजर राहण्याबाबतचे समन्स बजावले होते.
तथापि, सिंध प्रांतातील थत्ता येथील एक साक्षीदार स्थानिक दंडाधिकारीच केवळ दहशतवादविरोधी न्यायालयात हजर राहिले आणि त्यांनी सिंध प्रांतातील मिरपूर साक्रो येथे असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण केंद्राबाबत साक्ष नोंदविली.
मिरपूर साक्रो येथे समुद्रानजीक लष्कर-ए-तोयबाचे प्रशिक्षण केंद्र आहे, अशी साक्ष या प्रकरणातील खासगी साक्षीदार मुमताज याने दिली होती.
त्याबाबतची संदिग्धता दूर करणारी साक्ष दंडाधिकाऱ्यांनी नोंदविली, असे न्यायालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मार्च रोजी होणार आहे. या हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याच्यासह सात जणांविरुद्ध या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे.