दिल्लीतील निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार किरण बेदींच्या प्रचारफेरीची सुरुवात होताच पुढील तासाभरातच पांढऱ्या रंगाच्या ऑडी गाडीमधून प्रचार फेरीत सामील झालेल्या ‘नरेंद्र मोदी’ आणि ‘रामदेवबाबां’नी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रचारफेरी तिमरपूर परिसरात येताच स्थानिकांनी किरण बेदींकडे दुर्लक्ष करीत पांढऱ्या रंगाच्या ऑडीमधील मोदी आणि रामदेवबाबांबरोबर छायाचित्र काढून घेण्यासाठी त्यांच्या ऑडीभोवती एकच गराडा केला. प्रत्यक्षात ते दोघे नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा नसून हुबेहुब त्यांच्यासारखे दिसणारे दोन सामान्य व्यक्ती होते. मोदींसारखे दिसणारे अभिनंदन पाठक हे शहारणपूरमधील आरसी इंटर-कॉलेजमधील शारीरिक शिक्षण विभागाचे शिक्षक आहेत, तर रामदेब बाबांसारखे दिसणारे संजय हे मुखर्जी नगरमधील मोबाईल दुकानाचे मालक आहेत. किरण बेदींच्या प्रचार फेरीतील कार्यकर्ते घोषणाबाजी करून परिसरातील जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. परंतु, मोदी आणि रामदेव बाबांसारखे दिसणाऱ्या या दोघांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले. या दोघांनी भाजपचा प्रचार करत असल्याचा दावा केला. राजधानी दिल्लीत भाजप उमेदवारांबरोबर आपण प्रचारात सहभाग घेत असल्याचा दोघांनी दावा केला. परंतु, भाजप नेत्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी पाठक किंवा संजय यांना निमंत्रित केले नसल्याचे म्हटले आहे. भाजप उमेदवार किरण बेदींच्या प्रचारफेरीत सहभागी झालेले मोदींसारखे दिसणारे पाठक यावेळी म्हणाले, मी नेहमी सायकलवरून प्रवास करतो. परंतु, परिसरातील काही लोक मला रस्त्यात भेटली, ज्यांनी मला ही ऑडी गाडी काही काळासाठी वापरायला दिली. मोदी हे स्त्री शक्तीचे समर्थक असून, मी हे सर्व काही मोदींसाठी करीत आहे. आयुष्यभर मोदींची सेवा करण्याचा निश्चय मी केला आहे. हुबेहुब मोदींसारखे दिसणाऱ्या पाठक यांनी ८ मे रोजी वाराणसीमध्ये मोदींना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. संजय हे मुखर्जी नगरमधील भाजपचे कार्यकर्ते असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी मान्य केले असले तरी, प्रचारासाठी पाठक यांना आमंत्रित केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.