अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील विमानतळावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याचे वृत्त चुकीचे असून, गोंधळामुळे खळबळ उडाल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या ए-४ टर्मिनलमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त होते. याठिकाणी केवळ मोठा आवाज झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.  पण, चौकशीनंतर असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याचे वृत्त पसरले होते. या वृत्ताला संबंधित सुरक्षायंत्रणांकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नव्हता. लॉस एंजेलिस विमानतळाच्या परिसरात एक बंदुकधारी व्यक्ती असल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांनी संपूर्ण विमानतळाची कसून पाहणी केल्यानंतर याठिकाणी कोणतीही बंदूकधारी व्यक्ती नसल्याचे स्पष्ट झाले. विमानतळ प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. विमानतळ प्रवाशांसाठी काहीवेळ तात्पुरते बंद करण्यात आले होते. विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे हा गोंधळ उडाला होता.