महिलांची सुरक्षा या विषयावर नुसतेच चर्चेचे गु-हाळ चालविण्यापेक्षा वेगाने हालचाल करून वेगवेगळ्या उपाययोजना करायला हव्यात, असे मत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने व्यक्त केले. महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक पावलं टाकण्याची सध्या गरज असल्याकडेही तिने लक्ष वेधले.
‘जिंदगी लाईव्ह अवॉर्ड्स’च्या वितरणासाठी ऐश्वर्या राजधानीत आली होती. या कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, क्रिकेटपटू गौतम गंभीर, केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला हे उपस्थित होते.
ऐश्वर्या म्हणाली, मला अजिबात भीती वाटत नाही. उलट खूप राग येतो आणि तो व्यक्त करायलाही मी मागे-पुढे पाहणार नाही. आपल्यापैकी अनेकजण महिलांच्या सुरक्षेसाठी उपाय योजण्याची केवळ आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात महिलांना काहीच मिळत नाही. फक्त बोलत बसण्यापेक्षा कृती करण्याची आता गरज आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करायला हवेत. दोषींना तातडीने शिक्षा द्यायला हवी. त्यानंतर समाजात बदल झालेला पाहायला मिळेल.