देशाच्या सत्ताकारणातील सर्वात महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ७२ जागा जिंकल्यानंतर भाजपमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला होता. आता राज्याची विधानसभाही काबीज करायची या हेतून पक्षाने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेत ‘लव्ह जिहाद’विरोधात आघाडी उघडली. मात्र, राज्यातील पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपला तोंडघशी पाडले.  
पोटनिवडणुकीदरम्यान प्रखर हिंदुत्ववादी नेते व भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधात जोरदार प्रचार केला होता, परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करीत मतदारांनी समाजवादी पक्षाला पसंती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील रोहनिया विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. उमा भारती यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या चरखारी विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाने विजय मिळवला. भाजपचा वरचष्मा असलेल्या सहा मतदारसंघांत समाजवादी पक्षाने बाजी मारली आहे.  गुजरातमधील एकूण नऊ जागांपैकी रदिसा, मंगरौल व तलाजा वगळता अन्य सहा ठिकाणी भाजपने विजयाची पुनरावृत्ती केली आहे. मात्र तीन ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याने मोदींची गुजरातमधील जादू कमी झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. मोदी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या वडोदरा लोकसभा मतदारसंघावर भाजपने वर्चस्व कायम राखले.  तेलंगणातील मेडक लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीने वर्चस्व कायम राहिले आहे. पश्चिम बंगालमधील बशीरहाट दक्षिण व चौरंगी मतदारसंघात अनुक्रमे भाजप व तृणमूल काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. राज्यात भाजपने स्वबळावर विजय मिळवला आहे. आसाममधील सिलचरमध्ये भाजपने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. सिक्कीम व त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे एसडीएफ व सीपीएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. मैनपुरी लोकसभा मतदारसंघावर समाजवादी पक्षाने वर्चस्व कायम राखले आहे.

जनतेने भाजपचे ध्रुवीकरणाचे राजकारण नाकारले असून  मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारकिर्दीतच प्रस्थापितविरोधी घटक तयार झाला आहे. भाजप आणि मोदी सरकार वृत्ती जनतेला रुचलेली नाही,
–  शकील अहमद, काँग्रेस नेते