जगातील सर्वाधिक न्यूनतम तापमान तयार करण्यात इटलीमधील एका प्रयोगशाळेला यश आले आहे. शास्त्रज्ञांच्या मते विश्वात -२७३.१५० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असू शकत नाही. या पातळीला ‘अॅब्सोल्युट झिरो’ असे संबोधले जाते. या पाश्र्वभूमीवर इटलीतील ‘क्युओर’ या प्रयोगशाळेने एक घनमीटर आकाराचे एक तांब्याचे भांडे – २७३.१४४ एवढय़ा तापमानाला नेण्यात यश मिळवले आहे.
तत्त्वत: ‘अॅब्सोल्युट झिरो’चे तापमान नैसर्गिकपणे आढळणे अपेक्षित नाही. ही एक संकल्पना आहे, परंतु त्याच्या अगदी जवळ जाणारे तापमान तयार करून या प्रयोगशाळेने एक इतिहासच रचला आहे. सुमारे ४०० किग्रॅ वजनाचे हे तांब्याचे भांडे सुमारे १५ दिवस या अतिथंड अवस्थेत होते. या कालावधीत या भांडय़ाने ‘विश्वातील सगळ्यात थंड वस्तू’ हा बहुमान मिळवला.
‘क्युओर’ (क्रायोजेनिक अंडरग्राऊंड ऑब्झव्र्हेटरी फॉर रेअर इव्हेंट्स) ही प्रयोगशाळा इटलीच्या ‘न्यूक्लिअर फिजिक्स इन्स्टिटय़ूट’च्या ‘ग्रॅन सॅसो नॅशनल लॅबोरेटरी’मध्ये कार्यरत आहे. या प्रयोगशाळेत इटालीसह अमेरिका, चीन, स्पेन आणि फ्रान्समधील सुमारे १३० शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. ‘न्युट्रिनो’ या सूक्ष्मकणांचा अभ्यास करणे आणि काही दुर्मीळ प्रक्रियांचा शोध घेणे हे या प्रयोगशाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे.