भाजपच्या नेत्याने नियोजित बैठकीकडे दुर्लक्ष करत अपघातात जखमी झालेल्या कुटुंबियांना मदत करुन माणुसकी दाखवून दिली. आग्रा-लखनऊ महामार्गावर एका मुस्लिम कुटुंबियांचा अपघात झाला. या अपघातामध्ये संपूर्ण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना कोणीही त्यांच्या मदतीला जाण्याचे धाडस दाखवले नाही. यावेळी या मार्गाने जाणाऱ्या भाजपच्या नेत्याने या कुटुंबियांची मदत केली. उत्तर प्रदेशमधील एटा विधानसभेचे भाजप आमदार विपिन कुमार आग्र्याहून लखनऊला जात होते. त्यांना महामार्गावर गर्दी दिसल्यामुळे त्यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगून गर्दी कशामुळे जमली आहे, याची चौकशी केली.

यावेळी त्यांना अपघात झाल्याचे समजले. त्यांनी तात्काळ गाडीतून बाहेर उतरत अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत केली. या नेत्याने चक्क कुटुंबियांना लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयात दाखल करेपर्यंत रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देण्याचे काम केले. उन्नाव जिल्ह्यात येणाऱ्या हसनगंज पोलिस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच सदस्य कन्नोज जिल्ह्यातून बाराबंकी देवा शरीफ यात्रेसाठी चालले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी दुभाजकाला धडकली. या अघातामध्ये रुकसाना या महिलेचा मृत्यू झाला. तर वकार वारिस, अनिश, शहजाद हे गंभीर जखमी झाले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार अपघातानंतर या ठिकाणी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीने कुमार यांना हैराण केले. कारण अपघातस्थळी जमलेली मंडळी बचाव कार्यासाठी पोलीस आणि रुग्णवाहिकेला बोलवण्यासाठी पुढाकार घेत होती. पण या प्रत्यक्षात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीला कोणीच जात नव्हते.