गुरुग्राममधील रेयॉन स्कूलमध्ये दुसरीतील विद्यार्थ्याच्या हत्येच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली असतानाच उत्तर प्रदेशात शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका १५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. देवरिया जिल्ह्यात सोमवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माझ्या मुलीला इमारतीवरून ढकलून दिले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. पालकांच्या आरोपांमुळे शाळा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मुलीचा मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत का, याची तपासणी करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉडर्न सिटी विद्यालयात ही घटना घडली. मुलगी तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात गेली होती, अशी माहिती तपासात समोर आल्याचे देवरियाचे पोलीस अधीक्षक राजीव मल्होत्रा यांनी दिली. शाळेची मधली सुट्टी झाल्याने सर्व विद्यार्थी पटांगणात होते. त्याचवेळी मुलगी तिसऱ्या मजल्यावरून पडली. तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने गोरखपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार गोरखपूर येथे नेत असतानाच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीश श्रीवास्तव यांनी दिली.

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. कुणीतरी माझ्या मुलीला शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकले, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.