नासाने मंगळ मोहिमेचा सराव करण्यासाठी खगोलवैज्ञानिकांचे एक पथक अटलांटिक महासागराच्या तळाशी पाठवले आहे. मंगळावरील मोहिमेत अंतराळात खोलवर जावे लागणार आहे त्यासाठी हा सराव घेण्यात येत आहे. या सागरात गेलेल्या अंतराळवीरांना अक्वॅ नॉट म्हणजे महासागरवीर असे म्हटले जात आहे. सागरातील मोहिमेत निळा सागर व लाल भूमी यातील काही गोष्टी मंगळावर व पृथ्वीवर समान आहेत असे मानले जाते.

नासाच्या १६ दिवसांच्या या मोहिमेला नासा एक्सट्रीम एनव्हरॉनमें मिशन ऑपरेशन्स (एनइएमएमओ) २१ असे नाव देण्यात आले असून ती २१ जुलला सुरू झाली आहे, त्यात आंतरराष्ट्रीय चमू सहभागी आहे. त्यात विविध तंत्रज्ञानाच्या आधारे काही प्रयोग केले जाणार असून अवकाशयानातील परिस्थितीचे सादृश्यीकरणही केले जाणार आहे. सादृश्यीकरणातून तेथे स्पेसवॉकही केले जाणार असून अक्वॅरियस भागात हा सराव केला जाईल असे नासाने सांगितले आहे. अक्वॅरियस रीफ बेस या ठिकाणी ६२ फूट खोलीवर अटलांटिक महासागरातील फ्लोरिडा कीज नॅशनल मरीन सँक्च्युअरी येथे हा प्रयोग केला जाणार आहे. सागरात या चमूतील काही जणांचे वेगळे संघ तयार केले जाणार असून अवकाशवीरांचे सूक्ष्म गुरुत्वातील वर्तन व इतर गोष्टींचे सादृश्यीकरण केले जाणार आहे. मंगळाकडे व लघुग्रहाकडे जाणाऱ्या यानातील परिस्थिती वेगळी असणार आहे त्यामुळे हा कसून सराव घेतला जात आहे. नीमो २१ या प्रयोगात अवकाशवीर व इतर काहीजण पाण्यातील सराव करणार असले तरी तेथे मंगळासारखे काही भाग असणार आहेत, असे प्रकल्पाचे प्रमुख बिल टॉड यांनी सांगितले. अक्वॅरियसमध्ये आंतरराष्ट्रीय चमू वेगवेगळे संशोधन व अभ्यास करणार असून मिनी डीएनए सिक्वेन्सरची चाचणी केली जाणार आहे. नासाचे अवकाशवीर केट रुबिन्स यात सहभागी होणार आहेत. दूरवैद्यक उपकरणांची चाचणी आगामी अवकाश उपयोगांसाठी केली जाणार आहे. स्पेसवॉकचे सादृश्यीकरण करण्यासाठी सागरातील काही नमुने गोळा करण्यात येणार असून भूशास्त्रीय अभ्यास केला जाणार आहे. प्रवाळ बेटांचे पुनरुज्जीवन करण्याचाही एक भाग यात आहे. या सगळ्या कामांमध्ये संदेशवहनातील विलंबाचाही विचार केला जाणार आहे जो मंगळावर नेहमी होत असतो. त्यावरही तोडगा काढण्याच्या दिशेने प्रयत्न आहेत, कारण संदेशवहन उपकरण बंद पडले तर अनेक अडचणी येऊ शकतात. मंगळाचा पृष्ठभाग आपण कसा समजावून घेऊ शकतो यावर बरेच काही अवलंबून आहे असे टॉड यांनी सांगितले.