आज सकाळी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यांनी ज्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. जर आपल्या देशातील खासदारच असे वर्तन करत असतील तर या देशाच्या रक्षणाची जबाबदारी ईश्वरावरच आहे असे ते म्हणाले. कायदे निर्माण करणारी व्यक्तीच जर कायद्याचे उल्लंघन करत असेल तर कायदा पाळण्याची अपेक्षा कुणाकडून ठेवणार असा सवाल एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने केला. एअर इंडियाने खासदार गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांची तक्रार निवारण करण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले परंतु त्यांनी कुणाचेही ऐकले नाही असे एअर इंडियाने म्हटले. त्यांच्या या भूमिकेमुळे विमानाला पुढील प्रवासासाठी ४० मिनिटांचा विलंब झाल्याचेही ते म्हणाले. खासदाराच्या मारहाणी मुळेआपला चश्मा देखील तुटला असे सुकुमार यांनी म्हटले.

गायकवाड यांनी केलेल्या या वर्तनामुळे त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. यापुढे एअर इंडियामधून प्रवास करण्यास गायकवाड यांना बंदी असेल असे त्यांनी स्पष्ट केले. विमानामध्ये बसण्याच्या जागेवरून एअर इंडियाचा कर्मचारी आणि खासदार गायकवाड यांच्यात वाद झाला. त्याचदरम्यान चिडलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेने मारले. खासदार गायकवाड हे पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला जात होते. आपण बिझनेस क्लासचं तिकिट खरेदी केले होते. पण जेव्हा विमानात गेलो तेव्हा मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता. त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले. एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना  गायकवाड यांनी एअर इंडियावर गंभीर आरोपही केले.

एअर इंडियाच्या वरिष्ठांचे इतर खासगी कंपन्यांबरोबर मिलीभगत असल्याने ते बिझनेस क्लासची सुविधा पुरवत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मी बिझनेस क्लासचे तिकिट काढले होते. मला त्यांनी इकॉनॉमी क्लासमध्ये दिल्लीला आणले. मी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. दिल्लीत आल्यावर मी तक्रार पुस्तकात याची नोंद केली आणि याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलायचे असल्याचे सांगितले. मी तासभर विमानातच बसून होतो. नंतर एक अधिकारी येऊन माझ्याशी अत्यंत उद्धटपणे बोलू लागल्याचे ते म्हणाले. त्या अधिकाऱ्याला मी शिवसेनेचा खासदार असल्याचे सांगितले. तरीही तो ऐकण्यास तयार नव्हता. मला मोठमोठ्या आवाजात तो बोलत होता. त्याला विनवणी करूनही तो ऐकण्यास तयार नव्हता. मी पंतप्रधान मोदींशी बोलतो, असे म्हणत तो मला पकडायला आला. त्यावेळी मी त्याला पायातील सँडल काढून मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले.