चित्रपट रसिकांवर मोहिनी घालणारी गतकाळातील अभिनेत्री मधुबाला हिचा मेणाचा पुतळा आता दिल्लीच्या मादाम तुसाँ संग्रहालयात बसवला जाणार आहे. हे संग्रहालय या वर्षी सुरू होणार आहे. मुघल-ए-आझम चित्रपटात तिने अनारकलीची जी भूमिका साकारली होती, त्याच शैलीत तिचा मेणाचा पुतळा तयार केला जाणार आहे. मधुबालाने एके काळी हिंदूी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले होते.

चलती का नाम गाडी, मिस्टर अँड मिसेस ५५, काला पानी, हावडा ब्रीज यांसारख्या चित्रपटात तिच्या भूमिका होत्या. मेर्लिन एंटरटेनमेंट इंडिया प्रा. लि या कंपनीचे महाव्यवस्थापक व संचालक अंशुल जैन यांनी सांगितले, की मधुबालास दिल्लीतील मादाम तुसाँ संग्रहालयात स्थान मिळणार आहे ही आनंदाची बाब आहे. तिच्या मेणाच्या पुतळ्याने अनेक प्रेक्षक आकर्षित होतील व पुतळ्यासमवेत सेल्फी काढून चित्रपटाच्या सुवर्णकाळातील स्मृती पुन्हा जिवंत करून आपल्या सोबत घेऊन जातील. मधुबालाच्या सौंदर्याचा त्या वेळी जगात बोलबाला होता. १९५२ मध्ये ‘थिएटर’ या लोकप्रिय नियतकालिकात तिचे छायाचित्र झळकले होते. २००८ मध्ये मधुबालाच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने तिकीटही काढले होते. येथील रिगल इमारतीत साकारणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात अमिताभ बच्चन, शाहरूख खान, गायिका श्रेया घोषाल व आशा भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांचे मेणाचे पुतळे साकारले जाणार आहेत.