स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत आपले शहर आणि गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक शहरे आणि गावांमध्ये आजही उघड्यावर शौचाला जातात. मध्य प्रदेशातील रामबखेडी ग्रामपंचायतीनेही उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली असून, गावातील एका कुटुंबाला ७५ हजार रुपयांच्या दंड केला आहे. तसेच गावातील इतर ४३ कुटुंबांना नोटीस बजावली आहे.

गेल्याच महिन्यात ग्रामपंचायतीने या कुटुंबाला नोटीस बजावून उघड्यावर शौचास बसू नका, अशी तंबी दिली होती. पण त्याकडे या कुटुंबाने दुर्लक्ष केले. अखेर काल पंचायतीने कुटुंबातील दहा सदस्यांना ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती ग्रामपंचायतीचे कर्मचारी कुंवरलाल यांनी दिली. कुटुंबात १० सदस्य आहेत. प्रत्येकाला दिवसाला २५० रुपयेप्रमाणे एका महिन्याचा दंड केला आहे. तसेच उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासंदर्भात इतर ४३ कुटुंबांनाही नोटीस बजावली आहे, असेही त्यांनी सांगितले. अनेकदा सांगूनही या कुटुंबातील सदस्यांनी घरात शौचालय बांधले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे, असे या गावच्या सरपंच रामरतीबाई यांनी सांगितले. घरातील स्वच्छतागृहाचा वापर करा असे ग्रामस्थांना वेळोवेळी सांगितले आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.