देशातील मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे कोणतेही ज्ञान दिले जात नाही. तेथे दहशतवाद शिकविला जातो. मदरसे हे देशहिताचे नाहीत, असे खळबळजनक विधान भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.  त्यांच्या या विधानावर टीका करत भाजप देशात द्वेष भावना पसरवीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी आपल्या वास्तूवर तिरंगी ध्वज फडकाविणारा एकतरी मदरसा मला दाखवाल का, असा सवाल करीत मदरशांमध्ये जाणाऱ्या मुलांवर राष्ट्रप्रेमाचे संस्कार केले जात नसल्याची टीका उन्नाव मतदारसंघातील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केली. देशातील कित्येक शाळांना आज अनुदान नाही, मात्र राष्ट्रवादाशी काडीचाही संबंध नसलेल्या अशा मदरशांना भरघोस शासकीय अनुदान दिले जाते, याबाबत साक्षी महाराज यांनी खंत व्यक्त केली.
महाराज यांचे विखारी भाषण म्हणजे देशात धर्माच्या नावाखाली फाटाफूट पाडण्याचा प्रकार असून अशा प्रवृत्तींमुळेच समाजातील दरी रुंदावत चालली आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केली.
‘तर आणखी एक पाकिस्तान जन्मास येईल’
लखनौ : ‘मदरशांमध्ये दहशतवादाचे शिक्षण दिले जाते’ या भाजप खासदार साक्षी महाराज यांच्या विधानावर काँग्रेस-सपाने सडकून टीका केली आहे. विकासाच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्याऐवजी अशा विधानांद्वारे समाजात फूट पाडायची आणि आणखी एक पाकिस्तान निर्माण करायचा हा प्रयत्न आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली. तर हा सांप्रदायिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
भाजप खासदारांनी केलेला दावा संतापजनक असून आपल्या विधानाच्या पुष्टय़र्थ त्यांनी पुरावे सादर करावेत, असे आव्हान काँग्रेस पक्षाचे नेते मनीष तिवारी यांनी दिले आहे. अशा द्वेषमूलक विधानांद्वारे समाजात सांप्रदायिक तेढ निर्माण करायची आणि आणखी एक पाकिस्तान निर्माण करायचा हा प्रयत्न आहे, अशी टीका तिवारी यांनी केली.