कुख्यात गुंड-राजकारणी आणि माजी खासदार डी. पी. यादव भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हरयाणातील प्रचारसभांना त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहिल्याचे उघड झाले आहे. ‘समान विचारांची माणसे एकत्र येतातच.’ अशी खोचक प्रतिक्रिया यासंदर्भात काँग्रेसने दिली आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात सोमवारी तीन सभांमध्ये डी. पी. यादव अमित शहांबरोबर व्यासपीठावर हजर होता. ही गोष्ट उघड झाल्यानंतर भाजपाने यादवला सभेसाठी येण्याचे आमंत्रण दिले नव्हते (तो आगंतूक होता!) असा पवित्रा घेत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वत: यादव यानेच आपल्याला सभेला येण्यासाठी भाजपकडूनच सांगण्यात आले होते, असा दावा करीत भाजपचे पितळ उघडे पाडले.
या प्रकारावरून काँग्रेसने भाजपची चांगलीच खिल्ली उडवली. ‘भाजपाध्यक्षांनी आपल्यासोबत कोणाला घ्यावे हा सल्ला आम्ही देऊ शकत नाही. परंतु समान विचारांची माणसे एकत्र येतातच.’ अशी बोचरी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली.
दरम्यान, हरयाणामधील प्रचारसभांमध्ये अमित शहा यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिग हुडा यांना ‘मुजरेवाला’ असे संबोधून आणखी एक वादळ ओढवून घेतले. हिस्सार येथील जाहीर सभेत त्यांनी हुडा हे दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींच्या तालावर नाचतात, असे सांगताना ‘मुजरेवाला’ असा शब्दप्रयोग केला होता.