नेस्ले इंडिया कंपनी मॅगी नूडल्समध्ये घातक पदार्थ असल्याच्या मुद्दय़ावरून आणखी अडचणीत आली असून उत्तराखंडच्या अन्न सुरक्षा विभागाने नूडल्सच्या पंतनगर व अन्य ठिकाणी असलेल्या प्रकल्पात उत्पादित होणाऱ्या नूडल्सचे नमुने गोळा केले आहेत
उत्तर प्रदेशात अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाने मॅगीचे नमुने तपासून त्यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले होते तसेच शिशाचे प्रमाणही धोकादायक पातळीवर असल्याचे तपासणीत दिसून आले होते. उत्तराखंड येथे डेहराडून व पंतनगर येथून मॅगीचे नमुने घेऊन ते आता तपासण्यात येत आहेत. उत्तराखंडच्या अन्न सुरक्षा खात्याने नेस्लेच्या पंतनगर प्रकल्पातून आठ नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहेत, असे उधमसिंग नगरचे जिल्हाधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले.
नेसले इंडिया कंपनीने म्हटले आहे, की आमच्या उत्पादनांबाबत करण्यात आलेले आरोप आम्हाला मान्य नाहीत व आम्ही अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत. केंद्रीय अन्न व ग्राहक कामकाज मंत्रालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. काल बाराबंकी येथे स्थानिक न्यायालयात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा यांच्याविरोधात मॅगीची जाहिरात करून चुकीचे दावे केल्याबाबत खटले दाखल करण्यात आले. नेस्ले इंडियावरही वेगळा खटला दाखल केला आहे. नेस्लेच्या हिमाचल प्रदेशातील उना येथे असलेल्या प्रकल्पाविरुद्ध दावा लावण्यात आला असून दिल्लीच्या ‘इझी डे’ या संलग्न कंपनीवर तसेच त्यांचे व्यवस्थापक मोहन गुप्ता व शबाब आलम यांच्यावर दावे दाखल केले आहेत.