कुंभमेळ्यात शाहीस्नानासाठी येणाऱया भाविकांवर प्रदूषित पाण्यात स्नान करण्याची वेळ येऊ नये, यासाठी पुरेशी काळजी घेण्यात आली आहे, असा दावा करणारे उत्तर प्रदेशमधील अखिलेश यादव यांचे सरकार आता तोंडावर पडले आहे. भाविक गंगानदीच्या प्रदूषित पाण्यातच शाहीस्नान करीत असल्याचे उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरून स्पष्ट झाले.
अलाहाबादमधील संगमावर पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण सर्वांत जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. पाण्यातील बायो-केमिकल ऑक्सिजन डिमांडवरून (बीओडी) प्रदूषणाचे प्रमाण ठरविले जाते. सर्वसाधारणपणे प्रतिलिटर ३ मिलीग्रॅम बीओडीचे प्रमाण प्रदूषण मर्यादेत असल्याचे दर्शविते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण प्रतिलिटर ५ मिलीग्रॅम आहे. गेल्या १४ जानेवारी रोजी पहिल्या शाहीस्नानावेळी हेच प्रमाण प्रतिलिटर ७.४ मिलीग्रॅम होते.
प्रक्रिया न केलेले सांडपाणी काही जिल्ह्यांमधून नदीत सोडण्यात येत असल्यानेच प्रदूषणाची पातळी ओलांडल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांचे मत आहे. कानपूरमधून सर्वाधिक प्रमाणात प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीमध्ये सोडण्यात येते, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी सांगितले. काही कारखान्यांमधूनही गंगा नदीमध्ये प्रक्रिया न केलेले पाणी सोडले जाते. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कानपूर, कनौज, फारुखाबाद आणि उनाओ येथील कारखाने गेल्या एक महिन्यांपासून बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रदूषणाची पातळी नियंत्रित ठेवण्यात त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही.