येत्या आठवडाभरात प्रदेश भाजपची नवी कार्यकारिणी घोषित करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. दानवे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला आहे. काहीही अधिकार नसल्याने राज्यमंत्रिपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदासाठी दानवे यांनी दिल्लीत मोर्चेबांधणी केली होती. प्रदेशाध्यपदी वर्णी लागल्यानंतर दानवे यांनी आज, गुरुवारी सायंकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आनंदाने सण (होळी) साजरा करणारा मी एकमेव मंत्री असेल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
दिल्लास्थित निवासस्थानी दानवे म्हणाले की, गेल्या दहा महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. आता नवी जबाबदारी आल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे स्वतची टीम निवडणार आहेत. या टीमची घोषणा येत्या आठवडाभरात होईल, असे दानवे यांनी स्पष्ट केले. शिवसेना व भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेल्या परस्परविरोधी राजकारणावर ते म्हणाले की, दोन्ही पक्षांचा एकच मतदार आहे. त्यामुळे सारख्या कुरबुरी मतदाराला आवडत नाहीत. राज्यातील कारभारावर समन्वयाने तोडगा काढणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली.
महाराष्ट्रातून केंद्रीय वा राज्य मंत्रिमंडळात मोठा मराठा नेता नसल्याने दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदाची मोर्चेबांधणी यशस्वी ठरली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यात बहुसंख्य समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा एकही नेता नाही. ही जागा आपल्या रूपाने भरून निघाल्यास भविष्यात मुख्यमंत्रीपद मिळवण्याची दानवे यांना आशा आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीत जास्तीत जास्त दानवे समर्थकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.