विविध क्षेत्रांतील थेट परकीय गुंतवणुकीबाबत देशातील अनेक राज्य सरकारे नाक मुरडत असताना महाराष्ट्राने मात्र अत्यंत खुलेपणाने परदेशांतून होणाऱ्या गुंतवणुकीला वाट मोकळी केली आहे. त्यामुळेच गेल्या १२ वर्षांत देशातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे आढळून आले आहे.
केंद्रीय औद्योगिक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या कालावधीमध्ये महाराष्ट्रात तब्बल ६१.१३ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली. त्याखालोखाल दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) ३५.४ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली. या १२ वर्षांत देशात १८५.७ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली. त्यानुसार, देशातील एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आणि एनसीआरचा वाटा तब्बल ५२ टक्के आहे. महाराष्ट्र आणि एनसीआरमध्ये अधिक परकीय गुंतवणूक होण्यामागे येथील विकसित पायाभूत सुविधा आणि सरकारांचा सकारात्मक दृष्टिकोन ही कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्र व एनसीआरपाठोपाठ कर्नाटकात १०.२५ अब्ज डॉलर गुंतवणूक झाली. त्यानंतर तामिळनाडू (९.६ अब्ज डॉलर), गुजरात (८.५३ अब्ज डॉलर), आंध्र प्रदेश (७.४१ अब्ज डॉलर) आणि प. बंगाल (२.०४ अब्ज डॉलर) यांचा क्रमांक लागतो.
सेवा, संपर्क क्षेत्राला सर्वाधिक पसंती
परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीच्या क्षेत्रांत सेवा आणि संपर्क क्षेत्राचा अग्रक्रम असून त्याखेरीज ऊर्जा, संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर आणि बांधकाम क्षेत्रांचा समावेश आहे.
डॉलरची गंगा मॉरिशसमधून
देशातील काळा पैसा मॉरिशस देशाच्या माध्यमातून सफेद होऊन भारतात येत असल्याचा आरोप होत असताना गेल्या १२ वर्षांत या देशातूनच डॉलरचा ओघ वाढल्याचे दिसून आले आहे. २००० ते २०१२ या कालावधीत मॉरिशसमधून ७०.९ अब्ज डॉलर गुंतवणूक दाखल झाली. त्याखालोखाल सिंगापूरमधून १८.४ अब्ज, ब्रिटनमधून १७ अब्ज, जपानमधून १३.८३ अब्ज, अमेरिकेतून १०.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती औद्योगिक मंत्रालयाने दिली आहे.
सेवा, संपर्क आघाडीवर
परकीय गुंतवणुकीसाठी पसंतीच्या क्षेत्रांत सेवा आणि संपर्क क्षेत्राचा अग्रक्रम असून त्याखेरीज ऊर्जा, संगणक हार्डवेअर व सॉफ्टवेअर आणि बांधकाम क्षेत्रांचा समावेश आहे.