दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांनी भाजप खासदाराशी गैरवर्तणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी या कर्मचाऱ्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. सुनिल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात गेले होते. त्यावेळी येथील दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना हव्या असलेल्या टेबलावर बसण्यास मनाई केली. हे टेबल आरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे बसायचे नसेल तर उपहारगृहातून निघून जा, असे या कर्मचाऱ्यांना गायकवाड यांनी उद्देशून म्हटले. हे कर्मचारी माझ्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले, अशी तक्रार सुनील गायकवाड यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर कँटिनमधील दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घालणारे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याशी असलेल्या नामसार्धम्यामुळे काही दिवसांपूर्वीच सुनील गायकवाड यांना विमानतळावर त्रासाला सामोरे जावे लागले होते. रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाने नो-फ्लायर्स लिस्टमध्ये टाकल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुनील गायकवाड यांची विमानतळावर चौकशी झाली होती. दोघांचे आडनाव एकच आहे तसेच दोघेही खासदार आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांना वाटले की सुनील गायकवाड हेच रवींद्र गायकवाड आहेत. त्यामुळे त्यांना अडवून त्यांची विचारपूस करून केली गेली. आपण वेळोवेळी होणाऱ्या त्रासाबाबतची माहिती केंद्रीय राज्य मंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे दाद मागितली होती. गायकवाड हे आडनाव असणे हा गुन्हा आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला होता.