नोबेल पुरस्कारासाठी अनेकदा चर्चेत असणाऱ्या समाजधर्मी बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी विशेषत: कोलकात्याबाहेरून रीघ लागली होती खरी; पण प्रत्यक्ष अंत्ययात्रेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सहभाग असूनही फारशी गर्दी दिसली नाही.

अंत्यदर्शनासाठी या थोर लेखिकेचे पार्थिव नंदन थिएटरलगतच्या ‘रवीन्द्र सदना’त सकाळी १० पासून ठेवण्यात आले होते. शांतिनिकेतनातून, सिंगूरमधून कार्यकर्ते तेथे सकाळपासूनच येत होते. अंत्यदर्शनाला बरीच मोठी रांग लागणार असल्याचे गृहीत धरून कोलकाता पोलिसांनी या संकुलात सुमारे १०० मीटर लांबपर्यंत लोखंडी अडसर लावून संभाव्य गर्दीला शिस्त लावण्यासाठी जय्यत तयारी ठेवली होती. मात्र ही रांग दहा मीटरसुद्धा लागली नाही. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या अंत्ययात्रेलाही असाच थंडा प्रतिसाद होता. बंगालीत आवृत्त्यांवर आवृत्त्या निघालेल्या पुस्तकांच्या या लेखिकेचे अवघे ५०० वाचक तिच्या अखेरच्या निरोपासाठी हजर होते.

कालीघाट विद्युत दाहिनीत पद्मविजेत्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या इतमामात अंत्येष्टी पार पडली, तिथल्या पोलीस ठाण्यानेही  ५००च लोक असल्याची तोंडी माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.

असे का झाले? मॅगसेसे व साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून कोलकात्याचीच नव्हे तर पश्चिम बंगालची शान ठरलेल्या महाश्वेता देवींकडे कोलकातावासींनी पाठ का फिरवली? याचे एकच थेट उत्तर न मिळाल्याने, ही चर्चा यापुढेही सुरू राहील असे दिसते.

‘पीस हेवन’ या शवागृहात मृतदेह ठेवून रविवार किंवा शनिवारी अंत्यविधी करण्याचा पर्याय ममता बॅनर्जीच्या सरकारने मुद्दामच स्वीकारला नसावा, अशी इंग्रजीतील कुजबुज काही डाव्या विचारांच्या स्त्रीपुरुष कार्यकर्त्यांच्या एका गटात सकाळी रवीन्द्र सदनाबाहेर कानी पडली होती. तर बस वा मेट्रोने आपापल्या कामास जाणाऱ्या कोलकातावासींना महाश्वेता देवींबद्दल छेडले असता, ‘‘होत्या थोर; पण अलीकडल्या काळात त्यांच्या भूमिकेत सातत्य राहिले नव्हते,’’ हा सूर ऐकू आला. ममतांना नंदीग्राम आंदोलनापुरता पाठिंबा देणाऱ्या महाश्वेता देवींनी पुढे निवडणुकीत मात्र ममतांची साथ सोडल्याचे जाहीर केले होते. कॉलेजहून येणाऱ्या पाच-सहा जणांशी कसाबसा महाश्वेता देवींचा विषय काढल्यावर त्यापैकी दोघांनीच, ‘‘सुटल्या बिचाऱ्या. कोमातच होत्या किती दिवस’’ असे म्हणून पुन्हा मोबाइलमध्ये डोके खुपसले.