येथील संसद चौकात महात्मा गांधी यांचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला असून शनिवारी त्याचे अनावरण करण्यात आले. वसाहतवादी राजवटीत ब्रिटिश सरकारने ज्यांना कट्टर विरोधक मानले त्याच गांधीजींचा पुतळा उभारून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ९ फुटांच्या या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून व भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले, या वेळी गांधीजींचे आवडते ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन सादर करण्यात आले.
   अनेक राजकीय नेते व बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह, गांधींजींचे नातू गोपाळकृष्ण गांधी या वेळी उपस्थित होते. एके काळी विरोधक असलेल्या गांधीजींचा पुतळा उभारून ब्रिटनने सुसंस्कृततेची भावना वृद्धिंगत केली आहे, असे जेटली यांनी या वेळी सांगितले.
ब्रिटनच्या वेस्टमिनस्टरमधील संसदेच्या विरुद्ध बाजूला गांधीजींचा पुतळा उभारण्यात आला असून वर्णविद्वेषाविरोधात लढा देणारे नेल्सन मंडेला यांच्या शेजारीच गांधीजींचा हा पुतळा उभारला आहे. ब्रिटनचे युद्धकाळातील पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा पुतळाही गांधीजींच्या पुतळ्याजवळ आहे. चर्चिल यांनी गांधीजींना ‘अर्धनग्न फकीर’ म्हटले होते. १९३१ मध्ये गांधीजींनी लंडनला शेवटची थेट दिली होती, तेव्हा त्यांनी थंडीसाठी शाल गुंडाळली होती, त्याच स्वरूपात हा पुतळा आहे.
कॅमेरून यांनी सांगितले, की जगाच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्ती असलेल्या गांधीजींना ही आदरांजली आहे. आजही गांधीजींची शिकवण तितकीच लागू आहे.