राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू कनुभाई गांधी दिल्लीतील वृद्धाश्रमात राहायला आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली फरीदाबाद सीमेवरील गुरुविश्राम वृद्धाश्रमात गेल्या आठवड्यापासून कनुभाई मुक्कामी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कनुभाईंशी दूरध्वनीवरून संवाद साधला असून, त्यांना सर्व मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी वृद्धाश्रमात जाऊन कनुभाईंची भेट घेतली. दरम्यान, कनुभाई वृद्धाश्रमात राहायला आल्याने राजकीय वादविवाद रंगण्याची शक्यता आहे.
महात्मा गांधी यांचे तिसरे पुत्र रामदास यांचे कनुभाई हे ज्येष्ठ सुपूत्र आहेत. आपण वृद्धाश्रमात राहायला आल्याबद्दल कनुभाई कोणालाही दोष देत नाहीत. आपल्याला कोणाकडून काही मागयला आवडत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. कनुभाई यांनी अमेरिकेतील एमआयटीतून शिक्षण पूर्ण केल्यावर ‘नासा’मध्येही काही वर्षे काम केले.
मोदी आणि कनुभाई यांच्यामध्ये गुजरातीमधून दीर्घ चर्चा झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर लिहिले आहे. कनुभाई यांच्या काय अपेक्षा आहेत आणि त्यांना काय हवे आहे, याचा सविस्तर अहवाल द्यावा, असेही निर्देश नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना दिले आहेत.