केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. महेश शर्मांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून क्रिकेटपटू मॅक्क्युलमचे नाव घेतले. न्यूझीलंडच्या पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महेश शर्मांनी हा घोळ घातला. या कार्यक्रमाला न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रॅण्डन मॅक्क्युलम उपस्थित होते. यावेळी मंचावरुन बोलत असताना महेश शर्मा यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान मॅक्क्युलम असे म्हटले. यावरुन महेश शर्मा यांची चांगलीच शोभा झाली.

न्यूझीलंडकडून कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात खेळणारा ब्रॅण्डन मॅक्क्युलम जगभरात प्रसिद्ध आहे. मॅक्क्युलम आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. न्यूझीलंडच्या पर्यटन विभागाच्या कार्यक्रमाला ब्रॅण्डन मॅक्क्युलम पंतप्रधान जॉन की यांच्यासोबत उपस्थित होता. त्यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच ‘महामहीम पंतप्रधान मॅक्क्युलम’ असे म्हटले.

या कार्यक्रमाला बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रादेखील उपस्थित होता. महेश शर्मा यांनी केलेली चूक सुधारण्याचा प्रयत्न सिद्धार्थ करु पाहत होता. मात्र त्याला ऐनवेळी महेश शर्मांचे नावच आठवले नाही. काही क्षण गोंधळलेल्या सिद्धार्थने मग ‘ही प्लेबॅकची वेळ आहे’ असे म्हणत झालेला गोंधळ मिश्कीलपणे सावरण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी महेश शर्मा यांच्याकडून झालेल्या चुकीकडे दुर्लक्ष केले. ‘जास्तीत जास्त भारतीयांनी न्यूझीलंडला भेट द्यावी’, यासाठी न्यूझीलंड सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी जॉन की यांनी दिली.

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा न्यूझीलंडच्या पर्यटन विभागाचा भारतातील ब्रँड ऍम्बेसेडर आहे. ‘भारतातील तरुणांना न्यूझीलंडचे आकर्षण वाटावे म्हणून सिद्धार्थला ब्रँड ऍम्बेसेडर करण्यात आले आहे. आमच्या देशात जगातील काही नयनरम्य पर्यटनस्थळे आहेत,’ असे न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी या कार्यक्रमात म्हटले.

न्यूझीलंड सरकारच्या या कार्यक्रमात ऑल ब्लॅक्स या रग्बी संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. सिद्धार्थ मल्होत्राने गेल्या वर्षी चित्रीकरणासाठी न्यूझीलंडला भेट दिली होती. १० दिवस प्रमोशनल व्हिडीओंच्या चित्रीकरणासाठी सिद्धार्थ न्यूझीलंड दौऱ्यावर होता.