महिंद्रा एरोस्पेसने आपले १० आसनी विमान लवकरच आकाशात भरारी घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच आकाशात महिंद्रा कंपनीचे १० आसनी विमान भरारी घेताना दिसणार आहे. महिंद्र कंपनीच्या विमानाने नुकत्याच झालेल्या पॅरीस एअर शोमध्ये भरारी घेतली. या एअरशोमध्ये जगभरातल्या विमान कंपन्यांच्या विमानांचा सहभाग असतो. भारतीय कंपनी असलेल्या महिंद्र कंपनीने आपले दहा आसनी विमानही या शोमध्ये आणले होते. या विमानाला आता उड्डाण करण्याची संमती मिळाली आहे.

विमान कंपन्यांच्या स्पर्धेत आता महिंद्राचाही सहभाग दिसून येणार आहे. २०१८ मध्ये हे विमान उड्डाण घेण्यासाठी सज्ज होणार आहे. भारत, अमेरिका आणि अफ्रिका या तीन देशांदरम्यान या दहा आसनी विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे. या विमानाला आजवर २३ प्रकारची प्रमाणपत्रे मिळाली आहेत. विमान कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे हे आपण जाणतोच. अशात आता महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनेही या स्पर्धेत उडी घेतली आहे. येत्या काळात या विमानाला मिळणाऱ्या प्रतिसादावर या विमानाचे यश अवलंबून आहे.

या विमानाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्या चाचण्या झाल्या आहेत. तसेच या १० आसनी विमानाला ऑस्ट्रेलियन सिव्हील अॅव्हिएशन कंपनीनेही सुरक्षेचे सगळे निकष तपासून घेऊन ‘उडण्यास सज्ज’ असल्याची मान्यता दिली आहे,अशी माहिती महिंद्रा एरोस्पेस कंपनीचे अध्यक्ष एस. पी शुक्ला यांनी दिली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी ट्रॅक्टर आणि कारच्या निर्मितीत अग्रेसर असलेली कंपनी आहे. या कंपनीने २००८ मध्येच विमान कंपनी स्थापण्याची तयारी सुरु केली होती. त्यानुसार महिंद्रा ग्रुपने ऑस्ट्रेलियन गिप्सएरो या कंपनीसोबत हातमिळवणी केली. ऑस्ट्रेलियात असलेली ही विमान कंपनी छोटी विमाने तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानुसार बंगळुरूमध्ये २०१३ साली महिंद्रा आणि गिप्सएरो या कंपनीनेसोबत येत विमान निर्मितीची कंपनी स्थापन केली. याच कंपनीत हे दहा आसनी विमान संपूर्ण भारतीय बनावटीनुसार तयार करण्यात आले आहे.

मेक इन इंडियाच्या मोहिमे अंतर्गत महिंद्रा कंपनीने हे विमान भारतीय बनावटीनुसार तयार केले आहे. तसेच २०१५ मध्ये युरोपच्या कोन्सरटियम एअरबस कंपनीसोबत पॅरीस एअर शोमध्ये सहभागासाठी करार केला.नुकत्याच झालेल्या पॅरीस एअर शोमधल्या महिंद्रा कंपनीच्या विमानाचा सहभाग हा मेक इन इंडियाला पुढे आणण्यासाठी जागतिक बाजारपेठेतला एक मैलाचा दगड ठरणार आहे यात शंका नाही. महिंद्रा कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्र यांनीही या विमानाचा फोटो ट्विट करुन महिंद्राचे विमान आता भरारीसाठी आणि स्पर्धेसाठी सज्ज झाल्याचे म्हटले आहे.