अमेरिकेच्या एका संशोधक तरुणीवर गेल्यावर्षी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ‘पीपली लाईव्ह’ या हिंदी चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकी याला दिल्लीच्या एका न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवले.

अतिरिक्त सत्रन्यायाधीश संजीव जैन यांनी फारुकी याला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवणारा निकाल जाहीर करताच, आतापर्यंत जामिनावर असलेल्या फारुकी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिक्षेबाबतच्या युक्तिवादासाठी न्यायालयाने २ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली किमान ७ वर्षे सक्तमजुरी व कमाल जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

आपण संशोधन कार्यात फारुकीची मदत घेण्यासाठी त्याच्या घरी गेलो असता, त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या फारुकीने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने केली होती. तिच्या आधारे पोलिसांनी १९ जून २०१५ रोजी फारुकीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

फारुकीने दक्षिण दिल्लीतील सुखदेव विहार या निवासस्थानी कोलंबिया विद्यापीठातील या संशोधक तरुणीवर गेल्या वर्षी २८ मार्चला बलात्कार केल्याचे नमूद करणारे आरोपपत्र पोलिसांनी २९ जुलै २०१५ रोजी दाखल केले होते.

 

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत जवान शहीद

पीटीआय, रायपूर

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्य़ातील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या तुंबळ चकमकीत ‘कोब्रा’ बटालियनचा एक जवान शहीद, तर दुसरा जखमी झाला.

ही चकमक येथून ५०० किलोमीटर अंतरावर भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाट जंगलाच्या क्षेत्रात घडली. कुख्यात नक्षलवादी कमांडर हिडमा हा त्याच्या गटासह या भागात असल्याची निश्चित माहिती मिळाल्यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०८व्या ‘कोब्रा’ बटालियनचे एक पथक या भागात नक्षलविरोधी मोहिमेवर होते.

या बटालियनचे जवान एत्राजपाड व गाचोनपल्ली खेडय़ांदरम्यानच्या जंगलात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांच्या एका गटाने त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर दोघांनीही एकमेकांवर गोळीबाराच्या जोरदार फैरी झाडल्या.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कॉन्स्टेबल दर्जाचा एक जवान यावेळी ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. चकमकीची माहिती मिळाल्यानंतर लगेच जादा कुमक घटनास्थळी रवाना करण्यात आली. मृत व जखमी जवानाला जंगलाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.